‘त्या’ 12 भाजप आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दाखल केल्या 4 याचिका
नवी दिल्ली: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदारांनी अभूतपूर्व गोंधळ घातला होता. तसेच त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव आणत 12 आमदारांवर निलंबणाची कारवाई केली.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत 4 याचिका दाखल केल्या आहेत. निलंबित आमदारांपैकी एक असलेल्या आशीष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.
ठाकरे सरकारने भाजपाच्या आम्हा १२ आमदारांना चूकिच्या व बेकायदेशीरपणे निलंबित केले त्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका केली! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/mAWKHQuyI1
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 22, 2021
12 आमदारांचे 4 गट…
त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलत असतानाचा विडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले, आमच्या 12 आमदारांचे झालेले निलंबन एकदम चुकीच्या पद्धतीनं आणि बेकायदेशीररित्या करण्यात आल्याचं आम्ही आधीच म्हटलं आहे. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. आम्ही 12 आमदारांचे 4 गट बनवत 4 स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.
निलंबन तात्पुरते स्थगित करण्यात यावे…
आशीष शेलार पुढे म्हणाले, ज्या ठरावाद्वारे आम्हाला निलंबित करण्यात आलं, मुळात तो ठरावच बेकायदेशीर असल्यामुळे त्यास अवैध ठरवण्यात यावा यासाठी आम्ही न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यासोबतच निलंबनाचा आदेश तात्पुरता स्थगित करण्यात यावा आणि याचिकेचा निर्णय होईपर्यंत सर्व निलंबित आमदारांना त्यांचे हक्क बहाल करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली. तसेच आम्ही ही लढाई शेवट पर्यंत लढू असंही आशीष शेलार म्हणाले.
हे 12 आमदार निलंबित
आशिष शेलार ,जयकुमार रावल, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, अतुल भातखळकर, राम सातपुते, नारायण कुचे, हरिश पिंपळे, संजय कुटे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया, गिरीश महाजन