मराठी अभिनेता शरद केळकर यांनी अक्षय कुमारच्या “लक्ष्मी” चित्रपटातील लक्ष्मी पात्राबद्दल केला मोठा खुलासा!
नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटाला तसा संमिश्र प्रतिसाद मिळाला. परंतु या चित्रपटात लक्ष्मी ही व्यक्तिरेखा साकारलेला मराठमोळा अभिनेता शरद केळकरचं मात्र खूपच कौतुक झालं आणि चित्रपट प्रदर्शित होऊनही बरेच दिवस झाले असले, तरी रसिकांचे कौतुक थांबत नाहीय. नुकत्याच एका प्रथितयश मीडिया चॅनलद्वारे आपल्या रसिक चाहत्यांसमोर शरदने आपले लक्ष्मीचे खास अनुभव शेअर केले. ते त्याच्याच शब्दांत, खास आमच्या वाचकांसाठी.
‘लक्ष्मी’मध्ये तुझा अभिनय अक्षयकुमारपेक्षाही उत्तम होता, असं काही प्रेक्षक आणि समीक्षकांचं म्हणणं आहे. असे अँकर ने विचारल्यावर शरद म्हणाला की, “बिलकुल नाही…अक्षयकुमार एक मोठं नाव आहे. त्यांच्यावर ऍक्शन हिरोचा टॅग आहे. ‘हिरो’ अशी प्रतिमा आहे. ते एक उत्तम अभिनेते आहेतच. चाहत्यांना अक्षयकडून बरीच अपेक्षा आहे. ‘लक्ष्मी’मध्ये त्यांनी खरं तर चार भूमिका साकारल्या आहेत.
हे अत्यंत आव्हानात्मक होतं. प्रेक्षकांना मी साकारलेली एक व्यक्तिरेखा आवडतेय. पण, त्यांनी तर चार व्यक्तिरेखा चोख साकारल्या आहेत. उलट मी साकारत असलेल्या भूमिकेसाठी मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्यांच्या पूर्वीच्या कामांशी तुलना करत चाहते त्यांच्याकडून अधिक चांगल्या कामाची अपेक्षा करताहेत.
मुख्य ‘बम भोले’ या गाण्यात त्यांनी जबरदस्त सादरीकरण केलंय. माझी भूमिका काही मिनिटांची आहे म्हणून प्रेक्षकांना इतकी भावली. पण म्हणून अक्षयपेक्षा मी चांगलं काम केलंय हे मी मान्य करू शकत नाही. या तुलनेचा मला खरेच त्रास होतो.
या चित्रपटाबद्दल रसिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या असल्या तरी शरदने साकारलेल्या लक्ष्मीच्या भूमिकेची मात्र आजही सोशल मीडियावर चर्चा आहे. याबद्दल बोलतांना शरद म्हणाला की, “चित्रपटाच्या आवडीनिवडीचं स्वातंत्र्य प्रेक्षकांना असतं. मी यात सहसा पडत नाही. कारण मुद्दा प्रत्येकाच्या आवडीचा आहे. एखादा चित्रपट कोणाला आवडतो, तर कोणाला नाही. हा चर्चेचा विषयच बनू नये. माझ्या भूमिकेला इतका प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मी केली नव्हती.
चित्रीकरणानंतरही सेटवर चित्रपटाच्या टीमनं माझ्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यावेळी ‘आपण बरं काम केलंय’ ही भावना मनात होती. पण, प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळेल असं वाटलं नव्हतं. कारण लक्ष्मी या व्यक्तिरेखेसाठी विचारणा झाली, तेव्हा मी तर काही सेकंदांतच होकार दिला होता. ‘तान्हाजी’मध्ये मी साकारलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या मी शोधात होतो. त्यामुळे जराही वेळ न घालवता मी लगेच ‘हो’ म्हणालो.
चांगल्या मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या तर मी त्या स्वीकारतो. आगामी ‘दरबान’मध्ये मी साध्या लूकमध्ये आहे. वेगळ्या लूकमध्ये दिसण्याची माझी इच्छा नसते. पण मजा नक्कीच येते. नेहमीपेक्षा तुम्ही वेगळे दिसता. संदर्भांसाठी मार्गदर्शन मिळतं. एखाद्या कलाकाराला त्याच्या पेहरावाबद्दल आत्मविश्वास वाटत असेल तर त्याचा परफॉर्मन्स अधिक चांगला होतो.
अनेक वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे. पण ‘बाहुबली’चित्रपटासाठी व्हॉइस ओव्हर दिल्यानंतर माझी जास्त दखल घेतली गेली. तसे म्हणाल तर, ‘रामलीला’ या चित्रपटात काम केल्यानंतरच प्रेक्षकांनी माझी दखल घ्यायला सुरुवात केली होती. संजय लीला भन्साळी यांनी मला संधी दिली आणि त्यानंतर पुष्कळ गोष्टी बदलल्या. एका टीव्हीतल्या अभिनेत्याला चित्रपटांमध्ये संधी मिळू लागली. चित्रपट यशस्वी होतोय की नाही याचा मी फार विचार करत नाही.
मी फक्त माझं काम करतो. भविष्याविषयी मी फार चिंतीत नसतो. मी वर्तमानावर जास्त विश्वास ठेवतो. मी स्वत:ला स्मार्ट कलाकार समजतो; उत्तम कलाकार अजिबात नाही. उत्तम कलाकार तर मनोज वाजपेयीसारखे दिग्गज आहेत. माझी दखल घेतली जाईल इतपत स्मार्ट काम मी करत असतो. मी मर्यादित व्हॉइस ओव्हरचीच कामं करतो, विशेषतः ज्या गोष्टीचं लेखन चांगलं आहे, अशांनाच मी आवाज देतो.
लक्ष्मीसाठी सगळ्यात मोठी प्रतिक्रिया कोणाची आणि कशी होती हे सांगतांना शरद म्हणाला की, “सगळ्यात मोठी समीक्षक माझ्या घरी माझी बायको आहे. तिनं दिलेल्या सल्ल्यांचा मी नेहमीच विचार करतो. माझं काम बघितल्यानंतर ती तिचं प्रामाणिक मत देते. ‘लक्ष्मी’ बघून झाल्यानंतर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मला मिठी मारून ती ‘मला तुझा अभिमान आहे’ असं म्हणाली. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रतिक्रिया होती.
सध्या मी काही दाक्षिणात्य चित्रपटाचं चित्रीकरण करतोय. तिथल्या काही दिग्दर्शकांशी मैत्री झाली आहे. ‘लक्ष्मी’ ज्या चित्रपटावर आधारित आहे, अशा ‘कंचना’ चित्रपटात लक्ष्मीची भूमिका आर शरथकुमारनं साकारली आहे. त्यांच्यासारखा अभिनय करणं हे आव्हान होतं. पण तिथल्या काही दिग्दर्शकांनी सांगितलं की मी शरथकुमारपेक्षाही चांगलं काम केलंय. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. आणि कदाचित यामुळेच मी स्वत:ला उत्तम नव्हे, तर एक स्मार्ट अभिनेता समजतो.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.