‘या’ महिन्यात येईल कोरोनाची तिसरी लाट, AIIMS संचालकांनी दिली धक्कादायक माहिती
नवी दिल्ली: देशात सुरू असलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. अनेक राज्यांनी लावलेले निर्बंध आता टप्प्या-टप्प्याने शिथिल करत आहेत. दरम्यान, AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाची तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. अलीकडेच सिरो सर्वेच्या चौथ्या टप्प्यात समोर आलेल्या निष्कर्षांना ध्यानात घेऊन ते बोलत होते. ते म्हणाले, सिरो सर्वे मध्ये भारतातील दोन तृतीयांश जनतेमध्ये कोरोनाची प्रतिपिंडे आढळली असली तरी देशातील लोकसंख्येतील मोठा भाग अतिसंवेदनशील असू शकतो. त्यामुळे त्यांना तिसर्या लाटेत कोरोना संसर्ग धोका असू शकतो.
गुलेरिया यांनी सिरो सर्व्हेच्या निकालांचे विश्लेषण करताना म्हटले की अजूनही देशातील बरीच लोक लसी घेण्यास टाळाटाळ करत आहेत. यातील बर्याच लोकांना अजूनही संसर्ग झाला नाही आणि त्यांचे लसीकरणही झाले नाही. हे लोक अतिसंवेदनशील गटात येतात. यामुळे जरी सिरो सर्वेमध्ये दोन तृतीयांश लोकांत कोरोनाची प्रतिपिंडे सापडली असली तरी त्याचे सामान्यीकरण करता येणार नाही.
कधी येईल तिसरी लाट?
तिसरी लाट कधी येईल या विषयावर बोलताना गुलेरिया यांनी सांगितले की, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. याचे कारण सांगताना ते म्हणाले की, दुसरी लाट ओसरत असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. लोक गर्दी करत आहेत. प्रवास करत आहेत. कोविड नियमांचे पालन होत नाहीये, त्यामुळे पुढील 4-5 आठवडयानंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.
सध्या देशात एका दिवसाला सुमारे 30 हजार प्रकरणे समोर येत आहेत, जी एकेकाळी 4 लाख होती. परंतु जर आपण याची तुलना पहिल्या लाटेशी केली तर ही संख्या अजूनही जास्त आहे. तसेच दुसरी लाट संपली आहे असंही स्पष्ट सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनी कोविड नियमांचे पालन करा आणि शक्य तेवढ्या लवकर सर्वांनी लसीकरण करून घ्या. असंही त्यांनी म्हटलं आहे.