अजित डोवाल यांनी खरंच पाकिस्तानात राहून भारतासाठी हेरगिरी केली आहे का?
अजित डोवाल ही एक अशी व्यक्ती आहे, जिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आणि ज्याने देशासाठी हेरगिरी केली आहे, त्याच्यासाठी तर ही सर्वात असुरक्षित गोष्ट आहे! त्यांच्याशी संबंधित असलेल्या बऱ्याचशा गोष्टींबद्दल आपण सर्वजण नेहमी वाचत वा ऐकत असतोच.. पण आपल्यापैकी किती जणांना हे माहित आहे की ते पाकिस्तानात एक मुसलमान म्हणून राहिले, तेही एक दोन नव्हे, तर तब्बल सात वर्षे ! कशासाठी, अर्थातच देशासाठी हेरगिरी करण्याकरिता !
अर्थात वाटतं तितकं हे सोपं नव्हतं. पण पाकिस्तानमध्ये हिंदू म्हणून जगण्यापेक्षा मुस्लिम म्हणून जगणे खूपच सोपे आहे. पाकिस्तानमध्ये त्यांच्या अनुभवाविषयी पोस्ट लिहिण्यासाठी मुद्दाम गुगल सर्च केलं, तेव्हा ही चित्तथरारक गोष्ट समजली.
पाकिस्तानमधील वास्तव्यातील त्यांचं सर्वात मोठं कार्य होतं, अत्यंत परिपूर्ण असलेल्या लाहोर शहरात गुप्तहेर म्हणून काम करणं! ते लाहोरमध्ये सात वर्षे पाकिस्तानी मुस्लिम म्हणून राहिले. पाकिस्तान गुप्तचर आणि आयएसआय कारवायांची हेरगिरी करण्याचे सर्वात महत्त्वाचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या योजना, उपलब्ध मजबुतीकरण, शस्त्रे आणि ठिकाणे याविषयी माहिती गोळा केली.
त्यांच्यासाठी हा एक अद्भुत प्रवास होता – जोखमीने भरलेला ! पण यामुळेच ते निडर बनले. पुढे भारतात आल्यावर एका परिषदेत त्यांना पाकिस्तानमधील आपला एक अत्यंत कठीण व बाका क्षण आठवला. त्या एका प्रसंगावरून लक्षात येतं की एका भारतीयांचं पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून राहणं किती जिकिरीचं काम असू शकतं !
तो त्यांच्यासाठी एक सामान्य दिवस होता. आपण पाकिस्तानमधील एक मध्यमवर्गीय मुस्लिम असल्याचे भासवत एकदा त्यांनी एका मशिदीला भेट दिली. जेव्हा ते मशिदीतून बाहेर आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक चमकदार, पांढरीशुभ्र दाढी असलेली, एक अतिशय आकर्षक व्यक्ति सतत त्याच्याकडे पहात होती. स्थानिक लोकांना या वृद्ध माणसाबद्दल प्रचंड आदर होता आणि तो परिसरातील एक चांगला माणूस म्हणून ओळखला जात असे.
त्याने अजितला आपल्या जवळ बोलावून त्याच्या धर्माबद्दल विचारले आणि त्याच्यावर हिंदु असल्याचा आरोप केला. त्या वृद्ध माणसाच्या विचारण्याने अजित डोवाल क्षणिक हतबुद्ध झाले. परंतु, पकडले जाण्याची कोणतीच भीती चेहऱ्यावर न दाखवता त्यांनी तो आरोप सरळसरळ नाकारला. त्या म्हातार्याने मग अजितना त्याच्या मागोमाग येण्यास सांगितले.
आधी अजित बरेच गोंधळले होते. पण त्यांना त्याच्या मागे जावेच लागले. बर्याच अरुंद रस्त्यांमधून गेल्यावर शेवटी ते एका छोट्याशा घरात शिरले. तिथे पुन्हा त्या वृद्ध व्यक्तीने अजितवर हिंदु असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली. अजित यांनी पूर्णपणे त्याचा अस्वीकार केला. तथापि, त्या वृद्ध व्यक्तीने अजित डोवाल यांच्या कानातल्या छेदाकडे त्यांचे लक्ष वेधले आणि म्हणाले की कोणत्याही मुस्लिम व्यक्तीच्या कानाला असा छेद असणे शक्यच नाही ! आणि तिथेच अजित डोवाल यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली.
तथापि, सर्वात गंमतीची गोष्ट अशी होती की तो वृद्ध माणूस, पांढऱ्या दाढीच्या मागे मुसलमान म्हणून वावरत असलेला एक हिंदूच होता! पाकिस्तानमध्ये झालेल्या एका दंगलीत जमावाने तो सोडून त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ठार केले. त्यानंतर हिंसक जमावापासून स्वत: ला वाचवण्यासाठी त्याने आपली ओळख बदलली आणि तो मुस्लिम बनून वावरू लागला.
हे ऐकून अजित डोवाल यांना धक्का बसला. त्या म्हातार्याचे हृदय वितळले आणि म्हणाला की जेव्हा जेव्हा तो आपल्या लोकांना पाहतो तेव्हा तेव्हा त्याला बरे वाटते. कानातील छेद काढण्यासाठी अजितला प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नंतर त्याने आपलं कपाट उघडलं आणि आतील शिव आणि देवी दुर्गा यांच्या मुर्त्या दाखवल्या. त्यांची उपासना करत तो आपले शेवटचे दिवस व्यतीत करत होता.
अजित डोवाल यांनी मुस्लिम म्हणून पाकिस्तानमध्ये घालवलेल्या उत्तम आणि मनमोहक क्षणांपैकी हा एक आहे, असे ते मुद्दाम नमूद करतात.
लेखक- राजेन्द्र म्हात्रे