म्हणून राजकारणात अजितदादा कायम राजेंद्र पवार यांच्या पुढेच राहिले; वाचा, स्वतः राजेंद्र पवार यांनी सांगितलेला किस्सा…
राजकारण आणि त्या खालोखाल कृषी क्षेत्रात पवार कुटुंबातील व्यक्तींनी आपले नाव मोठे केले आहे. ज्यांच्यामुळे ‘पवार पॅटर्न’ देशभरात प्रसिद्ध झाला त्या शरद पवार यांनीही केंद्रीय कृषिमंत्री म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे. सलग 4 वेळा उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवारही शेतीची जाण असणारे नेते आहेत.
तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, राज्यपातळीवर काम करणाऱ्या नेत्याच्या खऱ्या गमती-जमती त्याच्या गावात गेल्यावर समजतात. बारामतीच्या भागात आजही असे म्हटले जाते की, उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे कृषी भूषण राजेंद्र पवारांवर अ’न्या’य झाला. राजकारणात ते अजितदादांमुळे पुढे येऊ शकले नाहीत. मात्र रोहित पवारांच्या रूपाने पवार कुटुंबाने हा अ’न्या’य भरून काढला, अशीही चर्चा असते. मात्र असे काही नसल्याचे पवार कुटुंबातील सदस्यांनी कायमच सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी शेती आणि सहकारातील दिगग्ज आप्पासाहेब पवार यांचे चिरंजीव, शरद पवारांचे पुतणे, अजितदादांचे भाऊ, आमदार रोहित पवारांचे वडील आणि बारामती ऍग्रोचे प्रमुख, कृषिभूषण राजेंद्र पवार हे abp maza च्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. अर्थात त्यांना या सर्व ओळखीपेक्षा कृषिभूषण राजेंद्र पवार ही ओळख जास्त महत्वाची वाटते, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते.
त्याचवेळी त्यांनी अजितदादा पवार राजकारणात कायमच पुढे का राहिले, याचा एक भन्नाट किस्सा सांगितला होता. त्यावेळी राजेंद्र पवार अकरावीत तर अजितदादा दहावीत होते. दोघांनाही शेती, मातीची आवड होती. तसेच त्यांना शेतीशी निगडीत व्यवसाय करण्याची ईच्छा होती.
मग त्यांनी गाईच्या दुधाचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी एका वेगळ्याच जातीच्या गायी बंगळुरूच्या भागात मिळायच्या. त्या गायी इकडे आणून मग व्यवसाय सुरू करण्याचे या दोन्ही भावंडांचे नियोजन होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी या व्यवसायाची कल्पना घरच्यांना दिली. मग अपेक्षेप्रमाणे घरच्यांनीही काही पैसे देऊन या दोघांना गायी आणण्यासाठी पाठवले.
त्याकाळी बजाज कंपनीच्या स्कुटरची देशभरात चलती होती. बजाजच्या ट्रक बंगळुरूला जाताना स्कुटर घेऊन जायच्या आणि येताना रिकाम्या यायच्या. पवारांची बजाज यांच्याशी ओळख असल्याने ट्रकमधून गायी आणायचे ठरवले. मजल दरमजल करत बंगळुरू गाठल्यावर या दोघा भावंडांनी पाहिजे त्या गायींची खरेदी केली. ट्रकने त्यावेळी प्रवासासाठी साधारण अडीच- तीन दिवस लागायचे. मग या पवार भावंडांनी आयडिया केली. जिथे ट्रक थांबेल तिथं राजेंद्र पवार गायींचं दूध काढायचे तर अजितदादा गायींना पाणी आणून द्यायचे. आणि त्याच ठिकाणी ते 3 रुपयांनी दूध विकायचे.
या प्रवासात राजेंद्र पवार गायींसोबत मागे बसलेले होते तर अजितदादा संपूर्ण प्रवासात ड्रायव्हरशेजारी केबिनमध्ये बसले होते. जेव्हा ते बारामतीत ट्रक घेऊन पोहोचले तेव्हा अजितदादांचे वडील अनंत पवार हे गमतीने आपल्या भावाला म्हणजे राजेंद्र पवारांच्या वडिलांना म्हणाले की, तो माझा मुलगाय म्हणून केबिनमध्ये बसला आणि तो तुझा मुलगा आहे म्हणून तो गायींजवळ बसला.
या मुलाखतीत राजेंद्र पवार म्हणाले होते की, अजित दादा तेव्हापासून केबिनमध्ये बसले ते आजवर ते तिथंच ‘केबिन’मध्ये बसत राहिले. ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वाटा निवडतात. मला राजकारणाच्या वाटेवर कधी यावं वाटलं नाही. आमच्यात कधी संघर्ष झाला नाही. राजकारणात अजितदादा तर कृषी क्षेत्रात राजेंद्रदादा यांनी अनेक नवनवे प्रयोग केले. आपापल्या क्षेत्रात दोघांनीही नाव कमावले.