नेमका असा काय झालायं “तांडव” मुळे मोठा तांडव की ह्या सिरिजला बॅन करण्यापर्यंत चर्चा रंगलीये ?
आजकाल एखादी वेबसिरीज, एखादा चित्रपट हा मुद्दामच वाद निर्माण करणारा बनवला जातो. यामुळे नकारात्मक प्रसिद्धीसोबतच त्या प्रोजक्टकडे लोकांची पाहण्याची उत्सुकता वाढायला लागते आणि दुसरं म्हणजे मार्केटिंगवर खर्च होणारा पैसा वाचवता येतो.
तुम्ही विचार कराल सध्या कोणता मुद्दा किंवा कोणत्या वेबसिरिजने असं काही केलयं? तर अर्थातच सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा असलेल्या “तांडव” या वेबसिरीजबद्दल मी बोलतोय. तांडव सिनेमाने सध्या भरपूर काॅंट्राॅर्वर्सी निर्माण करून ठेवली आहे. सध्या देशभरात अनेक राजकीय पक्षांकडून या सिरीजला मोठ्या प्रमाणात विरोध होताना पहायला मिळतो आहे.
एकीकडे काहींच म्हणणं आहे की, वेबसिरीजमधून हिंदू देव-देवतांचा थोडासा अपमान झाल्याच यात दिसून येत आहे तर इतर काहींच म्हणणं आहे की, अशा प्रकारे राजकिय घटनांची उलाढाल प्रेक्षकांसमोर मांडणं चुकीच आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा स्वातंत्र्याच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोयं, असेही अनेक मतप्रवाह पुन्हा निर्माण होत आहेत.
काही गोष्टींवर सेन्साॅरशीप ही हमखास आलीच पाहिजे, हादेखील मुद्दा तांडव वेबसिरीजमुळे चर्चेत आला आहे. काॅन्ट्राॅर्वर्सीमुळे नुकतीच सुचना व प्रसारण मंत्रालयाने अॅमेझाॅन प्राईमला नोटीसही बजावली आहे.
ह्या वेबसिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर हे आहेत. त्यांनी याआधी अनेक हिट अॅक्शनपटांची निर्मिती केली आहे. या वेबसिरीजमधे सैफ अली खान, सुनील ग्रोवर, कृतिका कामरा, डिंपल कपाडिया इत्यादींच्या भुमिका आहेत. अर्थातच सुनील ग्रोवर आणि सैफ अली खान आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांवर पात्राची जबरदस्त छाप पाडून जातात यात तिळमात्र शंका नाही.
वेबसिरीजमधून अनेक बाबी अजून गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत; अर्थात एकही सस्पेन्स पहिल्या सिजनमधे उघड होत नाही ही बाब मनाला पटत नाही. वेबसिरीजमधला दोन मिनीटांचा काॅंट्राॅर्वर्सीमधे प्रकाशझोतात आलेला सिन वगळता इतर वेबसिरीज सरासरी पाहण्यासाठी उत्तम मनोरंजन आहे असं म्हणता येईल. “आर्टीकल १५” सारख्या दर्जेदार चित्रपटाचे लेखन करणाऱ्या गौरव सोळंकी यांनी या वेबसिरीजचं लिखाण केल आहे.
अली अब्बास जफर व हिमांशू मेहरा यांनी निर्माण केलेलं हे राजनैतिक पटलं सरासरी निश्चितच पाहण्यासारखं ठरतं. परंतु तुम्ही जर अगदी भन्नाट कंटेंट पाहण्याचे आदी असाल तर तुम्हाला ही गोष्ट तितकी पटणार नाही, हे लक्षात असू द्या. तांडवमधल्या त्या दोन मिनीटांच्या सिनमधे असे दाखविल्या गेले आहे की, आजच्या काळात कशा पद्धतीने प्रभु “राम” हे प्रभु “शिवा” पेक्षाही प्रसिद्ध झाले आहेत.
ही बाब हिंदूधर्मातील देवतांच्या अस्मितेला ठेच लावणारी आहे, असं म्हणतं श्री. मनोज कोटक यांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अॅमेझाॅन प्राईमवर याबाबत स्पष्टीकरण मागितले असता तूर्तास त्यांच्या टीमने कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला आहे.
सोबतच दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सांगितले की, या वेबसिरीजचा कुठल्याही राजकीय घडामोडींशी कसलाही संबंध नाही, ही पूर्णत: काल्पनिक घटनेवर आधारित रचलेली कथा आहे. सोबतच माफी मागत सिरिजमधे योग्य ते बदल करण्याचे आवाहनदेखील अली अब्बास जफर यांनी केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!