यंदाची भाऊबीज आहे खूपच विशेष, जाणून घ्या भावाला ओवाळणी करण्याचा शुभ मुहूर्त…
कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे), वस्त्र किंवा एखादी वस्तू प्रेमाने देतो. ज्योतिष शास्त्रानुसार द्वितियेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या चंद्रकोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची खरी भावना आहे.
भाऊबीज कथा : सूर्याची पत्नी संज्ञा यांना दोन मुलं होती. पुत्राचे नाव यमराज तर पुत्रीचे नाव यमुना असे होते. संज्ञा आपल्या पती सूर्याची किरण सहन करुन शकत नसल्यामुळे उत्तरी ध्रुवात सावली बनून राहू लागली. उत्तरी ध्रुवात वस्ती केल्यानंतर संज्ञाचे यमराज आणि यमुना यांच्यासोबत व्यवहारात अंतर येऊ लागले. यामुळे व्यथित होऊन यमाने आपली यमपुरीत आपले वास्तव्य केले. यमपुरीत आपला भाऊ पापी लोकांना यातना देतो हे यमुनाला बघवत नसल्यामुळे ती गोलोक चालली गेली.
नंतर एकेदिवशी यमाला यमुनाची आठवण आली आणि तो बहिणीला भेटायला गेला. त्यादिवशी त्याने नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. भावाला बघून बहिण खूप खूश झाली. तिने त्याचे आदरपूर्वक स्वागत केले, त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घातले. भावाने खूश होऊन वरदान मागायला सांगितले तेव्हा तिने म्हटले की प्रतिवर्ष या दिवशी बहिण आपल्या भावाला जेवू घालून त्याला ओवळेल त्या भावाला यमाची भीति राहणार नाही. यावर यमराज तथास्तू म्हणून यमलोकाकडे निघून गेले.
तेव्हापासून कार्तिक शुक्ल द्वितीयला आपल्या भावाचा सत्कार करुन त्यांना ओवाळून बहिण भावासाठी जी प्रार्थना करते ती भावाला लाभते.
तिथी : कार्तिक शुद्ध द्वितीया
इतिहास : या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले.
महत्त्व: अपमृ’त्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.
‘या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.’
हा दिवस एकाच मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे.
या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देण्याघेण्याचे हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात.
भाऊबीज साजरी करण्याची पद्धत: यमतर्पण,यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे.
अपमृत्यू निवारणार्थ :
“श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये”
असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. ‘याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते. यम ही मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे. ‘प्रत्येक माणसाला मरण आहे’, ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कार्य वा धनाचा अपव्यय होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचे,
‘हे यमराज, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. जागरूकतेचे, प्रकाशाचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करीत आहोत, त्याचा स्वीकार कर. तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहीत नाही; म्हणून आम्ही आमचा हिशोब वेळच्या वेळी ठेवतो, ज्यामुळे अर्धवट राहिलेल्याची चिंता करण्याची वेळ येत नाही; कारण आम्हाला माहीत आहे की, तू अचानक कधीही येऊ शकतोस.’
- बहिणीने भावाला ओवाळणे.
- या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे.
- एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. `
- या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे अन् तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे.
- सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.
टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !