मंत्रिमंडळ विस्तार : ‘हे’ आहेत कॅबिनेट विस्तारातील मोठे बदल
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर आज (7 जुलै) पूर्ण झाला. 2019 ला दुसर्यांदा पदग्रहण केल्यानंतर पासून पहिल्यांदाच मंत्रिमंडळ फेरबदल / विस्तार करण्यात आला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आहेत. अनेक मोठ्या आणि जुन्या मंत्र्यांनी आज राजीनामा दिला आहे. तसेच अनेक नवीन चेहर्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या या विस्तारापूर्वी 12 नेत्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या धक्कादायक घटना घडल्या.
डॉ. हर्षवर्धन , रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी राजीनामा दिल्याने सर्वांनाच धक्का बसला. कोरोनाच्या दुसर्या लाटेचे संकट हाताळण्यात डॉ. हर्षवर्धन कमी पडत असल्याची टीका विरोधी पक्ष करत असे. हर्षवर्धन स्वत: डॉक्टर असून आरोग्यमंत्री तसेच विज्ञान मंत्रालयाचे प्रभारी होते.
रविशंकर प्रसाद हे सरकारच्या नव्या आयटी नियमांचे नेतृत्व करीत होते. या नियमांबाबत सरकार आणि ट्विटर समोरासमोर उभे आहेत. त्याचवेळी प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा देखील धक्कादायक पाऊल असल्याचे सिद्ध झाले आहे. जावडेकर हे सरकारचे प्रवक्तेही होते.
ज्योतिरादित्य सिंधिया यांना मंत्रिमंडळात स्थान
ज्योतिरादित्य सिंधिया यांचे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित झाले आहे. मार्च २०२० मध्ये सिंधिया यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी पक्षातून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे मध्यप्रदेशमधील तत्कालीन कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार पडले होते. त्यामुळे भाजपची सत्ता परत येण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मंत्र्यांची पदोन्नती
सात राज्यमंत्र्यांसह स्वतंत्र कार्यभार असलेल्या मंत्र्यांचीही पदोन्नती झाली आहे. या यादीत हरदीपसिंग पुरी, अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी यांचा समावेश असून त्यांनी नवीन मंत्री परिषदेत शपथ घेतली आहे.