कधी काळी पान टपरीवर पान विकायचा हा अभिनेता, आज आहे ‘चला हवा येऊ द्या’ मधला प्रसिद्ध कलाकार…
.
सध्याच्या काळात मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत अनेक लोकप्रिय विनोदी कलाकार काम करत आहेत. महाराष्ट्रात, देशात , इतकेच काय अगदी जगभरात आणि घराघरात पोहोचलेला अग्रगण्य विनोदी कार्यक्रम म्हणजे “चला हवा येऊ द्या” आणि या मालिकेतील हुकमी एक्का म्हणजेच भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम. भाऊच्या विनोदाची स्वतःची अशी वेगळीच शैली आहे. भोळा भाबडा चेहरा आणि विनोदाचे अचूक टायमिंग हे भाऊंचे प्रमुख अस्त्र. घराघरात भाऊंचा चाहता वर्ग आहे.
भाऊं कदम हे नाव रसिकांना प्रथम लक्ष्यात राहिले ते झी मराठीच्या ‘फू बाई फू’ ह्या विनोदी कार्यक्रमाने. आजमितीला भाऊ विनोदाचा किंग म्हणावे इतके मोठे झालेत. पण आयुष्यात ही प्रसिद्धी मिळवण्या अगोदर भाऊला खूप खडतर संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. अतिशय सामान्य कुटुंब, घरच्या जबाबदरीमुळे अगदी पानटपरी चालवणारा एक पानवाला, वडाळ्यातील राहते घर सोडून डोंबिवली मध्ये शिफ्ट होणारा भाऊ इ. अनेक चढउतारांचा हा धांडोळा.
मुंबईमधील एका सर्वसामान्य कोकणी कुटुंबात भाऊंचा जन्म झाला. वडील बीपीटी मध्ये कामाला आणि आई गृहिणी. राहायला अर्थातच बीपीटी क्वार्टर्स. खरे नाव भालचंद्र. पण लहानपणापासून घरचे सगळे भाऊ म्हणूनच हाक मारत. भाऊचा स्वभाव पहिल्यापासूनच शांत आणि लाजाळू. शाळा वडाळ्यातील ज्ञानेश्वर विद्यालय.
पण वडिलांचे अकाली निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी भाऊंवर आली. वडिलांच्या निधनामुळे शासकीय नियमांनुसार त्यांना बीपीटी क्वाटर्स सोडावी लागली. आपल्या कुटुंबासह भाऊ मग डोंबिवली येथे शिफ्ट झाले. भाऊंना मुळातच अभिनयाची आवड होती. पण परिस्थिती खडतर.
भाऊंचे गुरु विजय निकम यांच्या विनंतीनंतर भाऊच्या आईनी भाऊंना अभिनयक्षेत्रात जाण्याची परवानगी दिली. त्याकाळी भाऊंना वर्षात एखाददुसरे नाटक मिळत असे. दरम्यान मग भाऊंनी कॉम्पुटर कोर्स केला.
घर चालविण्यासाठी निवडणुकीच्या काळात मतदार याद्या करणे, नवीन मतदार नोंदणी इ. कामे भाऊ कॉम्पुटरवर करायचे. कामे करत. पण हा शाश्वत उत्पन्नाचा मार्ग नव्हता. उदरनिर्वाहासाठी भाऊंनी त्यांच्या भावासोबत पानटपरी उघडण्याचा निर्णय घेतला. नाटक नसतांना भाऊ स्वतः अनेक वेळा पानटपरीवर काम करत असत.
भाऊंना पहिल्यापासूनच अभिनयाची आवड. अनेक नाटकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या. कॉलेज मध्ये त्यांनी एकांकिकेमध्येसुद्धा भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी ‘कोब्रा ३७’ नावाचा एक ग्रुप बनवला होता. किशोर चौघुले, कमलाकर सातपुते ह्यासारखे नंतर लोकप्रिय झालेले या ग्रुपचे सदस्य होते.
अभिनेते सुद्धा होते. गुरु विजय निकम ह्यांनी ‘एवढाच ना’ ह्या व्यावसायिक नाटकातून भाऊंना पहिली संधी दिली. ह्या नाटकात एका विसरळू माणसाची भूमिका भाऊंनी अफलातून केली होती. पंधरा वर्षांमध्ये जवळपास ५०० नाटकांमध्ये भाऊंनी काम केले. पण एवढं करूनही मोठी संधी काही मिळत नव्हती. वैतागून भाऊंनी हे अभिनयक्षेत्रच कायमचे सोडून द्यायचा विचार केला.
पण नेमक्या वेळी ‘जाऊ तिथे खाऊ’ ह्या विजय निकमांच्याच नाटकांत त्यांनी भाऊला मुख्य भूमिका दिली. आणि हेच नाटक भाऊंच्या करिअरला कलाटणी देणारे ठरले. ह्या नाटकानंतर भाऊ जे सुटले ते परत मागे वळून न पाहण्यासाठीच. ‘एक डाव भुताचा’, ‘बाजीराव मस्त मी’ ह्या नाटकांमधील भाऊंच्या भूमिकांचे खूप कौतुक झाले. नवीन ओळख मिळाली.
भाऊंची सहज विनोद करण्याची शैली आणि भाबडेपणातुन घडणारे विनोद ह्यामुळे भाऊला ‘फु बाई फु’ ह्या शो ची ऑफर आली. पण लाजाळू स्वभाव आणि टीव्हीवर काम करण्याच्या भीतीमुळे त्यांनी ही ऑफर दोन वेळा नाकारली. इतकं मोठं आपल्याला कसं जमणार? असे भाऊला वाटायचे. परंतु जेव्हा भाऊला तिसऱ्यांदा ही ऑफर आली, तेव्हा त्यांनी ही ऑफर स्वीकारली आणि एवढेच नाही तर ‘फु बाई फु’ चे सहावे पर्व ते जिंकले सुद्धा.
मराठीतला पहिला ‘मिफ्टाअवार्ड’ महेश मांजरेकरांनी थेट दुबईत आयोजित केला होता. ह्या कार्यक्रमासाठी तिकीट आणि खाण्याचा खर्च आयोजकच करणार होते. भाऊंनाही आमंत्रण होतेच परंतु दुबईला जायचे म्हणजे पासपोर्ट, व्यक्तिगत खर्च ह्यासाठी भाऊंकडे पैसेच नव्हते.
अशा प्रसंगी भाऊच्या पत्नी सौ. ममता यांनी स्वतःची अंगठी गहाण ठेवून भाऊंना दुबई ला पाठविले होते. भाऊंचा ममता यांच्याशी प्रेमविवाह झाला असुन त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुली मृण्मयी, संचिती आणि समृद्धी आणि मुलगा आराध्य अशी त्यांची नावे आहेत.
‘फु बाई फु’ चा विजेता झाल्यावर भाऊंना डॉ. निलेश साबळे निर्मित “चला हवा येऊ द्या ” शो ऑफर झाला. भाऊ कदम सोबत स्वतः निलेश साबळे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे हे सर्व मिळून हा शो गाजवत आहेत. याच शो मुळे भाऊ कदम महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेत, आता केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांच्या सुद्धा ऑफर्स भाऊला येऊ लागल्या.
भाऊंनी नशीबवान, टाईमपास, वाजलाच पाहिजे गेम कि शिनेमा, हाफ तिकीट, जाऊ द्या ना बाळासाहेब, जगावेगळी अंतयात्रा, सांगतो ऐका, बाळकडू ह्यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच फेरारी की सवारी या हिंदी चित्रपटातही अभिनय केला आहे. जीवनाच्या या खडतर प्रसंगातून तावून सुलाखूनच भाऊचे करियर आज सोन्यासारखे झळकत आहे.