सावधान! कोरोना महामारीला षडयंत्र म्हणाल तर होऊ शकते अटक, दिल्लीत एका डॉक्टरवर गुन्हा दाखल
नवी दिल्ली: मागच्या वर्षी पासून भारतात सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीला खोटी आणि बनावट म्हणत समाज माध्यमांवर विडियो पोस्ट करणार्या दिल्लीतील एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरचे नाव डॉ. तरुण कोठारी आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच कोरोना महामारीला आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. तसेच लोकांना मास्क न घालण्याचे आणि लस न घेण्याची अपील करत आहेत. त्यामुळे दिल्ली गुन्हे शाखेच्या सायबर सेलने स्वत: सुमोटो घेऊन एफआयआर नोंदविले आहे.
पसरवली कोरोनाबाबत विवादस्पद माहिती…
दिल्लीत कार्यरत एमबीबीएस, एमडी रेडिओलॉजिस्ट तरुण कोठारी गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर कोरोना विरोधात बोलत खळबळ उडवली आहे. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक विडिओ पोस्ट केला होता. त्या विडिओमध्ये डॉ. कोठारी यांनी म्हटले की,
“पंतप्रधान, पोलिस कमिशनर, आयएएस, पत्रकार किंवा कोणीही तुम्हाला मास्क घालायला सांगितले तरी तुम्ही मास्क घालू नका. मास्कमुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होईल. त्यामुळे अनेक श्वसनसंबंधित आजार होऊ शकतात. परिणामी तुम्हाला दवाखान्यात भरती व्हावे लागेल. दवाखान्यात तुमच्यावर चुकीचा उपचार होईल आणि तुमची कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णात गणती होईल. त्यामुळे मास्क वापरणे थांबवा आणि हा विडिओ भारतभर वायरल करा.” यासोबतच डॉ. कोठारी सतत शारीरिक अंतर पाळू नका, लस घेऊ नका , मास्क घालू नका इत्यादि कोविड प्रोटोकॉल विरोधी सूचना करत असतात.
अनेक कलामंतर्गत गुन्हा दाखल…
मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने गुन्हा नोंदवून व्हिडिओचा तपास सुरू केला आहे. कोठारीविरोधात जामीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कलम 109 म्हणजे गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे, कलम 117 म्हणजे 10 पेक्षा जास्त लोकांना गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल, यासह सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कलम 188 आणि मुद्दाम इतरांचे आयुष्य धोक्यात आणल्याबद्दल कलम 269 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
अनेक वेळा खाते ब्लॉक झाले होते…
कोरोनाबाबत विवादस्पद माहिती पसरवल्याबद्दल फेसबुकने अनेक वेळा डॉ. कोठारीचे खाते बंद केले होते. मात्र, डॉ. कोठारी प्रत्येकवेळी नवीन खाते बनवून विडिओ शेअर करत असतात. ह्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राविरोधात माझे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे टायणी महातले आहे. त्यांचे फेसबुकवर हजारो फॉलोवर आहेत.