छोट्या भावाच्या मृत्यूनंतर मोठया भावाचे भावनिक पत्र

प्रिय अभि…..

वेळ कोणासाठी थांबत नाही. तू आम्हाला सोडून गेलास त्याला आज सहा वर्ष झाली. तरीही अजून आमच्यातच आहेस असं वाटतं. परंतु सत्य वेगळं आहे. तू गेलास ते परत कधीच न येण्यासाठी, पण तुझी खूप आठवण येते, मला एकट्यालाच नाही तर घरातील सगळ्यांना, तुझ्या मित्रांना, गोठ्यातील गाईला,शेतातील विहरीला, गावातील चावडीला…

अरे हां तुला मैत्रीण होती की नाही हे तू शेवटपर्यंत सांगतीलं नाहीस. तेवढी आदरयुक्त भीती तू जपलेलीस, खरं सांगू? तू गेलास आणि जगण्यातली सगळी मजाच गेली. ते टेरेस वर झोपणं, तुला नाईट क्रिकेटला खेळायला/बघायला घेऊन जाणं आजही अगदी काल घडल्यासारखं वाटतं…पण आता बॅट हातातही घेऊ वाटत नाही आणि घेतलीच व बॉल ‘फुल्लटॉस’ जरी आला तरी शॉट मारावा वाटत नाही, साला नियतीने तुला हिरावून घेऊन आमच्यावरंच ‘गुगली’ टाकलीय.

तू गेल्यापासून खूप काही बदललंय, उन्हाळ्यात ओढ्यातील पाणी जसं आटायचं तसं आता डोळ्यातील पाणी आटलंय. तुझ्या नसण्यांमुळे आयुष्यात दुष्काळ पडलाय, सगळं भकास वाटतंय रे.

तुला माझी ‘मिशी’ खुप आवडायची…म्हणायचा दादा…’एक नंबर मिशी आहे तुझी’. आता दाढी करताना तुझी आठवण येते आणि मिशी कापताना हात थरथरतो, कात्री मिशीला नाही काळजाला लागते. बाकी तुला हल्ली उचकी लागत नसेल ना जास्त? कारण आजकाल घरात तुझं नाव कमी निघतं. त्याचं नेमकं कारण माहीत नाही…असो…

अरे अर्जुनला तू घेतलेल्या तलवारीची आजही आठवण येते, शर्वील ला तर तू पाहिलंच नाहीस, तुला आवडला असता, तुझ्यासारखाच डॅशिंग आहे तो. सुप्रियाने तुला ‘भैय्यासाहेब’ म्हटलेलं भारी आवडायचं ना… तिला ही आता प्रश्न पडलाय की भैय्यासाहेब कोणाला म्हणायचं? तुझे दादा ,वहिनी हे दोन शब्द ऐकण्यासाठी आमचे कान उत्सुक असायचे.

असं कळालं की तुझा अपघात झाला त्यावेळी रक्ताने माखलेला तू रस्त्यावर बराच वेळ पडून होता, तुला खूप वेदना झाल्या असतील ना रे, अपघातानंतर जो काही वेळ जिवंत होतास त्यावेळी काय विचार केला असशील तू?

अपघात स्थळी त्या रस्त्यावर तुझं बरंच रक्त सांडलं होतं. लोकांनी Ambulance बोलावून तुला दवाखान्यात नेले, पण तू वाचू शकला नाहीस. अपघातासारखी दुर्दैवी वेळ दुसऱ्या कुणावर येऊ नये. पाच वर्षांपूर्वी तुझ्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त ‘रक्तदान शिबीर’ घेतलं होतं, आज ६ वे रक्तदान शिबीर आहे.

बेटा तुला माहितीय का? आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी आपल्या शिबिरात रक्तदान केले आहे. मला विश्वास आहे की त्या रक्ताच्या थेंबानी अनेकांचे जीव वाचले असतील.

आपण ‘सेकंड लाईफ’ हा लघुपट बनविला. त्यापाठीमागे हेतू एवढाच होता की तरुण मुलांनी जीवाला जपून बाईक चालवावी. तूझ्या सर्व आठवणी जिवंत ठेवायचा प्रयत्न करतोय. कदाचित तू वरून सगळं पाहतही असशील, कधी कधी वाटतं आवाज देऊन तुला परत बोलवावं. येशील का रे पुन्हा?

मी तुला सांगितलं होतं, लायब्ररी लाव, वाचन कर, अपघातानंतर पोलिसांनी तुझं सामान परत दिलं त्या पाकिटात लायब्ररीची रिसीट होती. तू म्हणालाही होतास ‘संभाजी’ वाचतोय दादा म्हणून. तुझा गर्व वाटलेला तेव्हा. कालच छत्रपती संभाजी महाराज मालिका संपली, तू पाहिजे होतास पाहायला, तुही आमचा ‘छावा’ होतास रे.

तुझं नाव कायम राहावं म्हणून धडपडतोय, थोडे अडथळे येतायत वाटेत, काटे येतायत पण मी जरा बाजूनं जायची स्वतःला सवय लाऊन घेतलीय. तू असतास तर काट्यांना तुडवून गेलो असतो.

असो…

घेतला वसा शेवटच्या श्वासापर्यंत टाकणार नाही…

चल आता थांबतो, येईन कधीतरी भेटायला मग परत मजा करू 💐💐💐💐.

अजित चव्हाण…..

Leave a Comment