पाणी रिचार्ज करून दुष्काळग्रस्त क्षेत्रात दरवर्षी २०० टन द्राक्षे पिकवितो हा अवलिया, एकरी उत्पन्न ऐकून थक्क व्हाल!
.
सरकारने आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे म्हणून मागील वर्षी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात १०,००० शेतकऱ्यांनी निदर्शने केली. अवकाळी पाऊस व कमी होत जाणारी यामुळे जिल्ह्यात दुष्काळ पडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
दुर्दैव हे की आजही इथली बरीच गावे पाणीटंचाईशी झगडत आहेत. याला अपवाद म्हणजे वडनेर भैरव गाव.
या गावात सुमारे ८० % लोक शेती करतात. हे गाव तेथील रसाळ आणि गोड द्राक्षांसाठी सुप्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीचा इथल्या शेतकऱ्यांवर फारसा परिणाम झालेला नाही. आजही इथे चांगले द्राक्षं उत्पादन होते. याचे श्रेय जाते गावातील द्राक्षं पिकविणारे शेतकरी बापूसाहेब साळुंखे यांना… चला तर मग जाणून घेऊ श्री. बापूसाहेब साळुंखे यांचा हा एक सायकल वरून सुरू होऊन थेट २ कार आणि ७ मोटारसायकल पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास.
३७ वर्षीय बापूसाहेब, गेल्या १५ वर्षांपासून आपल्या २२ एकर शेतीत पावसाचे पाणी साचवत असून वर्षाकाठी ते सुमारे 20 दशलक्ष लिटर पावसाचे पाणी वाचवित आहे. यासह पाण्यामुळे त्यांच्या शेतातील पिकेही बहरत आहेत.
- पावसाचे पाणी वाया जाण्यापासून रोखणे.
- भूगर्भातील पाणी रिचार्ज करणे.
- तलाव भरणे.
या त्रिसूत्री प्रक्रियेमुळे बापूसाहेब त्यांच्या शेतातील पाणी कमी होऊ देत नाहीत. श्री. साळुंके यांचे हे प्रेरणादायी कार्य पाहून त्यांच्या गावातील अन्य शेतकरीही पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्यावर विश्वास ठेवतात.
श्री. साळुंके यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले पण त्याने ते कधी मनावर घेतलं नाही. आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी म्हणूनच त्यांनी शेतीकडे पाहिले. ते सांगतात की, “आमच्या कुटुंबातील मुख्य काम शेती आहे आणि म्हणून मी पिके, बियाणे आणि माती यांच्यात वाढलो. माझे वडील एकटेच शेती सांभाळू शकत नव्हते म्हणून मी २००४ पासून त्यांना शेतीत मदत करण्यास सुरवात केली. दुष्काळग्रस्त भागात शेतकरी पाणीटंचाईच्या समस्येचा सामना किती कष्टाने करीत आहेत, हे त्यावेळी प्रथमच मला समजले. ”
त्यावेळी साळुंके कुटुंबीय धान्य आणि डाळी पिकवीत असत. द्राक्षे अगदी लहानशा क्षेत्रांत करायचे.
या भागात गारपीट होणे सामान्य आहे. आणि यामुळे द्राक्षपीक बऱ्याचदा खराब होते. त्यानंतर, कमी पावसामुळे तर परिस्थिती आणखी बिकट होते. बापूसाहेब म्हणतात की, “आम्हाला जमीन आणि वॉटरशेडच्या विकासाबद्दल काहीच माहिती नव्हते. या जमिनीत कोणती पिके योग्य ठरतील याचीही आम्हाला कल्पना नव्हती, ”
त्यांनी २००४ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेकडून पाच दिवसीय प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमात त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग, मायक्रो इरिगेशन आणि जास्त उत्पन्न देणारी बियाणे ओळखणे इत्यादी गोष्टी शिकविल्या गेल्या. साळुंके यांना हा कार्यक्रम खूप आवडला आणि नंतर त्यांनी ज्ञानवर्धनासाठी येथे आणखी प्रशिक्षण घेतले.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राध्यापक बी.एम. शेटे यांना दिले. प्रा. शेटे यांनी गेल्या ३५ वर्षात सुमारे १ लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
प्रा. शेटे सांगतात की, “येथे लाखो शेतकरी आहेत ज्यांच्याकडे जमिनीचा तुटवडा नाही, परंतु त्यांना अद्यापही चांगले उत्पादन मिळण्यास अडचणी आहेत. संस्थेत, आम्ही त्यांना त्यांच्याकडे आधीपासून उपलब्ध साधनसामुग्री वापरण्यास शिकवितो. साळुंखे यांचे शेत हे त्याचे एक उदाहरण आहे. सूक्ष्म सिंचन करून, ते द्राक्षांचे पोषण कमी न करता चांगले उत्पादन घेत आहेत.”
प्रशिक्षण घेतल्यानंतर आता बापूसाहेब अधिक आत्मविश्वासाने उत्कृष्ट शेती करीत आहेत. २००७ मध्ये त्यांनी आपल्या एक एकर जागेवर सहा लाख रुपये खर्चून पाणलोट तलाव बांधला. त्यांनी शेतात एक विहीरही खोदली आहे. बापूसाहेब सांगतात, “तलाव २७५ X 155 फूट असून साठवण क्षमता २० दशलक्ष लिटर आहे.”
त्यानंतर त्यांनी अर्ध्या एकरात आणखी एक पाणलोट तलाव बांधला, ज्यामध्ये 50 लाख लिटर पाणी गोळा केले जाऊ शकते. सिंचनानंतर पाणी वाहू नये म्हणून त्यांनी आपल्या शेताभोवती उंच बांध बनवले आहेत. यामुळे मातीची धूप थांबते, पावसाचे पाणी साचते आणि भूजल पातळी वाढते.
ते म्हणाले, “हे बांध इतर शेतकऱ्यांसाठीही उपयोगी ठरन आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळीतही वाढ होते.
बापूसाहेबांनी आपल्या शेतासाठी सूक्ष्म सिंचन प्रणाली तयार केली आहे. यामध्ये झाडांच्या मुळांच्या जवळपास ठिबक ने पाणी दिले जाते. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व द्राक्षेमणी चांगले पोसतात. त्याचे वाढते फायदे पाहून साळुंके यांनी इतर पिकांची लागवड करण्याचे सोडले. आज ते संपूर्ण क्षेत्रात द्राक्षच पिकवतात.
बापूसाहेब सांगतात की, “द्राक्ष लागवडीसाठी मी अनेक सेंद्रिय पद्धती अवलंबल्या आहेत, जसे की मल्चिंगसाठी पॉलिथिनऐवजी ऊसच्या पाचटाने माती झाकणे. त्यामुळे ओलावा टिकून मातीची गुणवत्ता वाढते. खतासाठी हा देखील एक चांगला पर्याय आहे.” ते शेणखत वापरतात जेणेकरून रासायनिक खतांचा वापर कमीतकमी होतो. यापूर्वी त्यांच्या ३ ते ५ एकर शेतीचे सिंचन करणेही अवघड होते. आता त्यांनी पाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण २२ एकर क्षेत्र ओलिताखाली आले.
त्याच्या शेतात द्राक्षांच्या ८ वाणांची २२ हजार वेली आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पादन २०० टन आहे, जे बापूसाहेब भारतासह रशिया, चीन, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये विकतात. ते म्हणतात की,” द्राक्ष पिकाला योग्य किंमत मिळणे अद्याप अवघड आहे कारण मध्यस्थ बरेच आहेत. हे टाळण्यासाठी, मी मुख्यतः परदेशातच माझे उत्पादन निर्यात करण्याचा प्रयत्न करतो.”
बापूसाहेबांची आर्थिक प्रगती झालीय. त्यांचे एकरी उत्पन्न ४ लाख रुपये आहे. शेवटी बापूसाहेब सांगतात की, “जेव्हा मी शेती करायला लागलो, तेव्हा मी सायकल चालवत असे. आज माझ्याकडे २ कार आणि ७ मोटारसायकली आहेत. मी कधीच विचार केला नाही की पाणी वाचवण्याने माझे आयुष्य बदलू शकेल. पाणी खरोखरच अनमोल आहे. “