कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते? जाणून घ्या यंदाच्या वर्षीचे कोजागिरी महत्त्व, पूजन विधी आणि श्रीलक्ष्मी स्तोत्र…
वाचकहो! कोजागिरी पौर्णिमा म्हणजे मन, आचार, विचार आणि संस्कारांच्या जागृतीचा उत्सव, वैभवाचा अन आनंदाचा सोहोळाच जणू! केवळ झोपलेले नसणे, म्हणजेच जागृत असणे असा काही याचा अर्थ नाही. याचा खरा अर्थ म्हणजे सर्वांगाने अन सर्वार्थाने जागृत असणे असा अपेक्षित आहे. कोजागिरीच्या पौर्णिमेच्या उजळत्या रात्री, देवी श्रीलक्ष्मी अवकाशातून विहार करतांना भाविक भक्तांनावविचारते, ‘को जागरति?’ अर्थात, या भूतलावर कोणकोण जागृत आहेत?
कोजागिरीचे महत्त्व : अश्विन शुद्ध पौर्णिमेलाच ‘कोजागिरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. या रात्री श्रीलक्ष्मी पूजन करावयाचे असते. मनोरंजक खेळ खेळत, गप्पागोष्टी करत रात्रभर जागरण करायचे असते. हिंदू धर्मग्रंथानुसार अशी त्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, `कोण जागे आहे?’ जी व्यक्ती जागृत असेल, त्याला देवी श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आपण जाणतोच की, साक्षात श्रीलक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! कोजागिरीचे असे महत्त्व लक्षात घेऊन अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात.
ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा सोहोळा, वैभवाचा आणिक आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, असा अर्थ या संदर्भात आपल्याला अभिप्रेत नाही. तसे पहाल तर असे जागरण आपण प्रतिदिन करतोच की, परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, आचार, विचार आणि संस्कार जपत जागृत असणे, हे म्हणजे खरे जागरण. आणि अशा जागृत माणसालाच श्रीलक्ष्मी प्राप्त होते. आळशी, उदास, निरुद्योगी व निद्रिस्त विचारांच्या व्यक्तींपासून श्रीलक्ष्मी दूरच जाते.
कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी पूर्णत्व प्राप्त होऊन पूर्णतः उजळलेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. सबब संपूर्ण वर्षापेक्षा त्या रात्रीचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात नभ मेघांनी भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे वर्षाऋतू गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात कोजागिरीचा चंद्र अधिक चित्ताकर्षक भासतो.
चंद्र म्हणजे सुंदरता आणि शीतलता यांचे प्रतीक आहे. त्यापरीच सुंदरता आणि शीतलता आपल्याही आयुष्यात यावी, हाच कोजागिरी रात्रीच्या चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या भोवताली अशी शांत, निर्विकार आणिक संत वृत्तीचे लोक असतील, तर आपण त्यांच्या सहवासात रमतो. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते. कोजागिरी निमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हे केवळ निमित्तमात्र कारण, त्यानिमित्ताने सहभोजन आणि मनोरंजक कार्यक्रम रंगतात. चंद्रावर आधारित सुमधुर गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते.
कोजागिरी पूजन विधी : लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदळाने हत्ती रेखाटून त्याला हळद-कुंकू वाहिले जाते. फुले , हार वाहिले जातात. श्रीसुक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते. देवीला आणि चंद्राला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. काही ठिकाणी दुधाच्या जोडीला पोहे व तत्सम चटपटीत पदार्थांचा बेत ठेवला जातो. पूजन झाले की, खालीलप्रमाणे देवीचा श्लोक म्हणून या पूजेची सांगता केली जाते.
कोजागिरी श्रीलक्ष्मी स्तोत्र :
अश्विने शुद्धपक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमा
तद्रात्रौ पूजनं कुर्याच्छ्रियो जागृतिपूर्वकम्
निशीये वरदा लक्ष्मी: को जागतीरति भाषिणी
जगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले।।
तात्पर्य : वाचक मित्रांनो कसे असते की, रोजच स्वयंपाक करणे, जेवण वाढणे, उष्टी-खरकटी काढून धुणीभांडी करणे या त्याच त्या जीवनचक्रात अडकलेल्या आपल्या या माता-भगिनींना कोजागिरी व तत्सम सणांच्या निमित्ताने तेव्हढीच थोडीशी विश्रांती अन सोबत थोडे मनोरंजन, पोटभर गप्पा आणि स्वरुची भोजनाचा सहकुटुंब आस्वाद… आणि एव्हढ्यानेही त्या माऊली खुश होतात हो… मग ? काय हरकत आहे अशी कोजागिरी साजरी करायला? नाही का…?
शुभं भवतु:!…