नाशिक करंसी नोट प्रेस मध्ये कोणी चोरी केली? झाला खुलासा, ऐकून धक्का बसेल
नाशिक: येथील करंसी नोट प्रेस (CNP) मधील झालेल्या 5 लाखाची चोरी प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करंसी नोट प्रेसमध्ये चोरी झालीच नाही. तर झालं असं की, नोट प्रेस मध्ये काम करणार्या दोन सुपरवायजरने चुकून पाच लाखाच्या बंडलला पंच म्हणजे नष्ट केले. या घटनेमुळे दोघेही घाबरले होते आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकते या भीतीने त्यांनी ही बाब कोणालाही सांगितली नाही.
पोलिसांच्या मते, ह्याच कारणामुळे ते 5 लाख रुपये ऑडिटमध्ये आढळून आले नाहीत. सीएनपीने 5 महीने या प्रकरणाचा तपास केला,मात्र तपासात काहीच निष्पन्न होत नसल्याने त्यांनी शेवटी पोलिसांत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी उच्च सुरक्षा क्षेत्रातील (High Security Zone) पैशांच्या चोरीबद्दल केलेल्या तपासात आणि लोकांच्या चौकशीत हे उघड झाले. हा अपराध नसल्याने पोलिस आपल्या कायदेशीर विभागाशी चर्चा करीत आहेत. परंतु सरकारचे 5 लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी दोन्ही सुपरवायजर विरोधात सीएनपी कारवाई करू शकते.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यातील आहे. नोट प्रेस मध्ये काम करणार्या दोन सुपरवायजरने चुकून 5 लाख रुपये पंच म्हणजे नष्ट केले होते. परंतु, कारवाई होण्याच्या भीतीने त्यांनी ही बाब कोणालाही सांगितली नाही. 4 ते 5 महीने सीएनपी मधील अधिकार्यांनी या प्रकरणाचा अंतर्गत तपास केला, मात्र तपासात काहीच उघड न झाल्याने त्यांना पोलिसात तक्रार करावी लागली.
पोलिसांनी चोरीचा मामला दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी शेकडो तासांची सीसीटीव्ही फुटेज खंगाळले. अनेक लोकांची विचारपूस केली, कारण केंद्राच्या सुरक्षेचा मामला होता. केंद्राच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनीही पूर्ण ताकत लावून ह्या प्रकरणाचा अखेर खुलासा केला.