आजची नवदुर्गामाता आहे देवी शैलपुत्री, जाणून घ्या माता शैलपुत्रीची व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

देवी म्हणजे आदिशक्ती स्वरुप! स्वयंभू असल्याकारणे तिला ‘आदिशक्ती’ असेही संबोधतात. तसे पहाल तर या आदिशक्तीची नानाविध रूपे आहेत. नवरात्रीमध्ये मात्र त्यातल्या नऊ विशिष्ट रूपांचेच पूजन होते. त्यांच्या वैशिष्टय़ांमुळेच त्यांना ‘नवदुर्गा’ म्हणून संबोधतात. प्रत्येक नवदुर्गाची कथा, उपासना, मंत्र आणि पूजनविधी वेगवेगळे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.आजची देवी आहे…

शैलपुत्री: देवीच्या नऊ रूपांपैकी ही एक. नवरात्रीच्या पहिल्या रूपात ती ‘शैलपुत्री’च्या नावाने ओळखली जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळता, स्थैर्य, कटीबद्धता येते. सदोदित भरकटणारे मन देवीच्या या रूपाच्या नुसत्या स्मरणमात्राने कणखर, निर्भय आणि स्थिर होण्यास मदत होते.

पर्वताचा राजा हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म झाल्यामुळे या देवीला शैलपुत्री हे नाव पडले आहे. हिचे वाहन (वृषभ) म्हणजेच बैल आहे. ज्यावर ती विराजमान आहे. तिच्या डाव्या हातात त्रिशूल व उजव्या हातात कमळाचे फूल असते. असे मानले जाते की, प्रजापती राजा दक्षाच्या घरात तिने जन्म घेतला, तेव्हा ती सती या नावाने ओळखली जात होती. तिचे लग्न भगवान शिवशंकर यांच्या बरोबर झालेले होते.

एकदा प्रजापती दक्षाने खूप मोठय़ा यज्ञाचे आयोजन केले होते. परंतु सतीला तसेच भगवान शंकरांना मात्र या यज्ञासाठी आमंत्रणही नव्हते. तरीही सती या यज्ञासाठी पित्याच्या घरी पोहोचली, तेव्हा कोणीही तिच्याशी नीट वागले बोलले नाही. जावई असलेल्या भगवान श्री शिवशंकरांचाही अपमान केला. अपमानित भावनेने सतीने सं’ता’पा’ने आपला दे’ह य’ज्ञ’कुं’डात समर्पित केला.

तिने पुढच्या जन्मी शैलराजाच्या घरात हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेतला आणि ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली. ‘पार्वती’, ‘हैमवती’ ही सुद्धा सतीचीच नावे आहेत. एका कथेनुसार तिने हेमवतीच्या रूपात देवतांचे गर्वहरण केले होते. या शैलपुत्रीचा विवाह भगवान श्री शिवशंकरांशीच परत झाला. म्हणून नवदुर्गामध्ये शैलपुत्रीला प्रथम स्थान असून तिचे महत्त्व, शक्ती अनन्य आहे.

पूजाविधी : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्नानादी नित्यकर्मे करून शुचिर्भूत व्हावे. एक चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर देवीचा फोटो ठेवावा. ‘शं’ हे अक्षर केशराने लिहावे. नंतर गणपती, कुबेर या मूर्तीसोबत मंगलकलश स्थापन करून घ्यावा. त्यानंतर आपल्या मनोकामनेच्या पूर्तीसाठी ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे!’ हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. देवीला कोणतेही एक लाल फूल अर्पण करावे आणि पुढील स्तोत्र पठण करावे.

ऐश्र्वय यत्प्रसादेन सौभाग्यारोग्यसम्पद:।
शत्रुहानि परो मोक्ष स्तूयते सा न किं जन:।।
न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे।
नापदं तस्य पश्यामि शोकदु:खभयं न हि।।

पूजेचे महत्त्व : या देवीची पूजा करणाऱ्या, भक्तसाधकांना दुष्ट, दुराचारी आणि क्रूर प्रवृत्तींशी संघर्ष करण्यासाठी शक्ती मिळते. शैलपुत्री देवी शक्ती, सामर्थ्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. शैलपुत्री मातेच्या मंत्राजपामुळे प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण होते, तिच्या भक्तीपूजेमुळे मनुष्य व्याधीमुक्त होतो. अशी मान्यता आहे.

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Leave a Comment