आमिर खान आणि किरण राव यांच्याप्रमाणेच शिवसेना-भाजपची मैत्री कायम राहील – संजय राऊत
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यापासूनच राज्यात राजकीय शेरेबाजी जोमात सुरू आहे. भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात. मात्र, मागील काही दिवसांपासून दोन्ही गटाचा सुर बदलताना दिसत आहे. मागील काही दिवसातील दोन्ही पक्षातील नेत्यांच्या मुलाखती आणि त्यांचे वक्तव्य पाहता मैत्रीचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनीही भाजप-शिवसेना मैत्रीचे संकेत दिले आहेत. पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी म्हटले की, “शिवसेनेचे भाजपसोबतचे नाते बॉलीवुड अभिनेते आमिर खान आणि किरण राव यांच्या नात्यासारखे आहेत.”
We are not India-Pakistan. Look at Aamir Khan and Kiran Rao, it is like them. Our (Shiv Sena, BJP) political ways are different but the friendship will remain intact: Shiv Sena leader Sanjay Raut on BJP's Devendra Fadnavis' 'we are not enemies' remark pic.twitter.com/OUPdztS9Od
— ANI (@ANI) July 5, 2021
दोन दिवसांपूर्वीच आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतला असल्याचे जाहीर केले होते. मात्र, वेगळे झालो असलो तरीही आम्ही भविष्यात चांगले मित्र म्हणून राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना माजी सहकारी भाजपकडे पुन्हा मैत्रीचा हात देत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत संजय राऊत यांनी म्हटले की, “आम्ही (शिवसेना-भाजप) काही भारत-पाकिस्तान नाही. आमचे नाते आमिर खान आणि किरण राव यांच्यासारखे आहे. आमचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी आमची मैत्री कायम राहील.”
देवेंद्र फडणवीस यांनीही दिले मैत्रीचे संकेत
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रविवारी म्हटले की, “शिवसेना काही आमची शत्रू नाही. फक्त काही मुद्द्यावर आमची वेगळी मते आहेत. आमच्यात कोणतीही दुश्मनी नसून, वैचारिक मतभेद आहेत. राजकारणात ‘जर-तर’ ला काही महत्व नसते. राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात.”