पंकजा मुंडे यांची महाराष्ट्र भाजप वर अप्रत्यक्ष टीका, म्हणाल्या…
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवल्याने राज्यभरातील पंकजा मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या गोष्टीचा निषेध करत राजीनामा सत्र सुरू केले . पंकजा मुंडे समर्थकांच्या राजीनामा सत्राने भाजपमधील अंतर्गत राजकारण गरम झाले.
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज नसल्याचे राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. स्वतः पंकजा मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचे म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. दिल्लीतून परतल्यानंतर त्यांनी वरळीत त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी त्यांच्या मनातील अनेक गोष्टी बोलून दाखवल्या व अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील भाजपच्या राजकरणावर निशाणा साधला.
प्रवास खडतर आहे…
“मी निवडणुकीत पडली असली तरी संपले नाही. मी जर संपली असती तर मला संपवायचे प्रयत्नसुद्धा संपले असते. पण मी आज संपली नसून तुम्हा कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी आहे, मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता आणि पुढेही खडतर राहील.” असं कार्यकर्त्यांशी बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझ्या समाजातील माणसाच्या पदाला अपमानित करण्याचे माझे संस्कार आहेत का?
केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा असताना आणि त्या लायक असतानाही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. पण माझं वय 42 आहे भागवत कराड यांचं 65 झालं आहे. 65 वर्षीय माझ्या समाजातील माणसाचा आणि त्यांचा पदाचा मी अपमान करावा हे माझे संस्कार नसल्याचेही त्या म्हणाल्या.
माझा निवडणुकीत पराभव झाला. कुणाचा पराभव झाला नाही? मी त्याने हरले नाही. आपण सात्विक माणसं आहोत. 90 टक्के वारकरी आहोत. अविचाराने कोणताही निर्णय घ्यावा का असंही त्यांनी कार्यकर्त्यांना विचारलं?
अप्रत्यक्ष टीका…
मी धर्मयुद्ध टाळत आहे. मी कौरवाप्रमाणे न वागता पांडवाप्रमाणे वागत धर्मयुद्ध टाळत असल्याचेही त्या म्हणाल्या. मोदी, शाह माझे नेते आहेत म्हणत त्यांनी राज्यातील एकाही नेत्याचे नाव घेतलं नाही. पत्रकारपरिषदेत या बाबत विचारले असता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले. “ राज्यात माझ्याकडे कोणतेही पद नाही. मी राष्ट्रीय पातळीवर काम करत असल्याने मोदी शहाच माझे नेते आहेत.”
या प्रसंगी त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत त्यांना समज दिली.