पात्रता असूनही केवळ या कारणामुळे पंतप्रधान होऊ शकले नाहीत प्रणब मुखर्जी, जाणून घ्या काय होते ते कारण…
.
तर झाले असे की, तो काळ होता मे २००४ सालचा. निवडणुका झाल्या होत्या आणि यूपीएने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात बहुमत मिळवले होते. सोनिया गांधींना भारताच्या भावी पंतप्रधान म्हणून देशातील जनतेने मानसिकरित्या स्वीकारले होते. पण इथे राजकारणाला एक इंटरेस्टिंग वळण मिळाले.
परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून सोनिया गांधींना घेरण्यात आले. विरोधकांनी फेकलेला हा जीवघेणा बाउन्सर सोनिया गांधींनी अतिशय प्रभावी पद्धतीने चुकवला. तत्क्षणी स्वतः पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पडून काँग्रेसच्या इतर बड्या नेत्यास पंतप्रधानांच्या खुर्चीची ऑफर देऊन त्यांनी स्वतः सुप्रीमो बनण्याचा निर्णय घेतला की, ज्याकडे पूर्ण सर्वाधिकार असतील. सोनियांकडे अधिकार सर्व पण जबाबदारी आणि उत्तरदायित्व मात्र शून्य. शिवाय पंतप्रधान पदाची खुर्ची नाकारून जनतेत त्यागमूर्तीची जी प्रतिमा झळकली ती वेगळीच.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून सोनियाजींनी आपले नाव मागे घेतले आणि मग काँग्रेसमध्ये पंतप्रधानांच्या शोधास सुरवात झाली. शेवटी तीन नावं पुढे आली. मनमोहन सिंग, अर्जुन सिंग आणि प्रणब मुखर्जी.
अर्जुनसिंग यांचा दावाच कमकुवत होता. असे म्हणतात की प्रणब मुखर्जी हे सफाईदार हिंदी बोलू शकत नव्हते. फक्त या एकाच कारणामुळे मनमोहन सिंग यांना प्रणब मुखर्जी यांच्यापेक्षा झुकते माप मिळून जास्त पसंती मिळाली.
तथापि, राजकीय वर्तुळमध्ये ही चर्चा रंगली होती की, प्रणबदा यांच्या हिंदीच्या प्रॉब्लेम व्यतिरिक्त त्यांचा स्वाभिमानी, स्वतंत्र बाणा हा हाय कमांडच्या हातातील बाहुलं बनण्यात अडचणीचा ठरला. परिणामी प्रणबदा पात्रता असूनही पंतप्रधान होऊ शकले नाही. असा कबुलीजबाब त्याकाळच्या त्यांच्या सर्कल मधील निकटवर्तीयांनी दिला होता.
नंतर मनमोहन मंत्रिमंडळात त्यांना पहिले संरक्षणमंत्री आणि नंतर परराष्ट्रमंत्री करण्यात आले. मनमोहन सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ते अर्थमंत्री झाले. २०१२ मध्ये ते भारताचे तेरावे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.
प्रणबदांच्या राष्ट्रपती पदाचीही एक खास आठवण इथे होतीय, ती म्हणजे, प्रणबदा पहिल्यांदा जेंव्हा खासदार झाले, ही वेळची गोष्ट आहे. त्यांची बहीण त्यांना भेटायला आली होती. अचानक चहा पिताना प्रणबदा यांनी आपल्या बहिणीला सांगितले की, “पुढच्या जन्मामध्ये राष्ट्रपती भवनातील अश्वशाळेत बांधलेला घोडा म्हणून जन्माला यावे अशी त्यांची इच्छा आहे.” यावर त्याची बहीण अन्नपूर्णा देवी उसळून म्हणाली, “तुम्ही घोडा का व्हाल? याच जन्मात तुम्ही राष्ट्रपती व्हाल.” आणि भविष्यात अगदी तस्सेच झाले. ती भविष्यवाणी योग्य असल्याचे सिद्ध झाले. प्रणबदा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे थेट राष्ट्रपतीच झाले.
प्रणबदा यांचा जन्म बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील मिराती येथे झाला. बंगाली ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या प्रणबदा राजकारणात येण्यापूर्वी महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांची राजकीय कारकीर्द जेव्हा ते ३४ वर्षांचे होते तेव्हापासून सुरू झाली. इंदिरा गांधींनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना राज्यसभेवर पाठविले. इंदिरा गांधींच्या मृत्यूपर्यंत ते त्यांचे विश्वासपात्र राहिले.
इंदिराजींच्या अकाली निधनानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा प्रणव दा यांनी कामाची सर्व जबाबदारी स्वीकारली. तथापि, इंदिराजीनंतर स्वत: सत्तेत येण्याची त्यांची इच्छा होती, असा आरोपही त्यांच्यावर लावला गेला. आपल्या ‘द टर्ब्युलंट इयर्स’ या पुस्तकात त्यांनी हे आरोप निक्षून पूर्णपणे नाकारले आहेत.
राजीव गांधी सत्तेवर आल्यावर प्रणव मुखर्जी यांचे राजकीय कारकीर्द खालावली. त्यांना प्रथम बाजूला सारले गेले आणि नंतर त्यांनी सहा वर्षे कॉंग्रेसकडून निलंबित केले. दुखावलेल्या प्रणव मुखर्जी यांनी स्वत: चा एक नवीन पक्ष स्थापन केला. ‘नॅशनल सोशलिस्ट कॉंग्रेस’. तथापि, या पक्षाचे आयुष्य खूपच कमी ठरून केवळ तीन वर्षांत पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाला.
१९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर प्रणब मुखर्जी यांची कारकीर्द पुन्हा एकदा सुरू झाली. पीव्ही नरसिंहराव यांनी त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष केले. राव सरकारमध्ये पहिल्यांदाच त्यांनी परराष्ट्रमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.
इथेही एक गोम अशी की, जेव्हा राव पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मुखर्जींना त्यांच्या मंत्रिमंडळाचा भाग बनवले नाही. राव यांचे चांगले मित्र म्हणून ओळखले जाणारे प्रणबदा आणि इतर राजकीय पंडितांसाठी हे आश्चर्यकारक होते. प्रणवदा यांना राव यांनी याचे कारण “नंतर” सांगतो असे सांगितले, पण ती “नंतर” कधीच आली नाही.
आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनात प्रणब दा यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, वाणिज्य आणि वित्त मंत्रालयाचे कामही त्यांनी हाताळले होते.
आज सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी आपले माजी राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी यांचे नि-ध-न झाले आहे. त्यांना “भावपूर्ण श्र-द्धां-ज-ली…!”