तिसरी लाट येणार आहे तर घाबरून घरीच बसायचे का? राज ठाकरेंचा धक्कादायक सवाल
पुणे: देशासह राज्यात कोरोनाची तिसरी संभावित लाट सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येणार असल्याच्या सूचना तज्ञ वारंवार देत आहेत. अशातच तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करत आहे. त्यासाठी राज्यातील कोविड निर्बंध पुन्हा कडक करण्याची शक्यता दिसत असून, यावर बोलताना राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले.
तिसरी लाट येणार म्हणून आतपासूनच घरात बसायचं का? असा सवाल करत ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ अशी या महविकास आघाडी सरकारची अवस्था झाली असल्याची जोरदार टीका राज ठाकरे यांनी केली.
यांना लॉकडाउन लावायला काय जातय?
पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तिसरी लाट येणार म्हणून आतापासूनच घाबरून घरात बसायची कोणती पद्धत आहे. लोकांचे व्यवसाय, उद्योगधंदे बंद होत आहेत. अनेकांचे रोजगार गेलेत, नोकर्या गेल्या. लोकांना घर चालवणे कठीण होऊन बसलय आणि सरकार पुन्हा लॉकडाउन लावण्याचा विचार करत आहे. यांना लॉकडाऊन लावायला काय जातय? असा सवाल त्यांनी महाविकास आघाडी सरकारला केला.
भाजपसोबत युतीबाबत म्हणाले…
राज ठाकरे यांनी जर त्यांचे परप्रांतियाबाबतचे धोरण बदलले तर आम्ही युती बाबत विचार करू असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझे धोरण स्पष्ट आहे आणि ते देशहित आणि राज्य हिताचे आहे. मी उगाच बैल मुतल्यासारखे विचार करत नाही. माझे मत सरळ आहे, आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाही तुम्ही आमच्यावर करू नका. सध्या आसाम आणि मिजोरम मध्ये तेच होत आहे.