संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले 2024 साठी नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत ‘हे’ आहेत योग्य उमेदवार
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही मोठा चेहरा नाही. जोपर्यंत विरोधकांकडे मोदींना टक्कर देण्यालायक चेहरा येत नाही, तोपर्यंत मोदींचा पराभव शक्य नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मोदींच्या तुलनेत शरद पवार योग्य उमेदवार
2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठा चेहरा न देता पराभव करणे कठीण असल्याचे म्हणत असतानाच नरेंद्र मोदींच्या तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच योग्य उमेदवार असल्याचे मोठे विधान त्यांनी केले आहे.
राहुल गांधी मोठे नेते पण…
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “राहुल गांधी एक मोठे नेते आहेत, परंतु त्यांच्यापेक्षाही मोठे नेते सध्या हयात आहेत. कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत संकट आहे. अद्यापही ते पक्षाध्यक्ष निवडू शकले नाहीत.” तेच दुसरीकडे विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार्या प्रशांत किशोरचे त्यांनी कौतुक केले. प्रशांत किशोर यांनी बंगालमध्ये चांगली कामगिरी केली असल्याचे ते म्हणाले.
प्रशांत किशोर यांना नेमकं काय करायचं आहे हे मला माहीत नाही. ते देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात योगदान देऊ शकतात. जर गैर-राजकीय व्यक्ती असे प्रयत्न करत असेल तर त्यांना सर्वांची मान्यता मिळते. 2024 साठी मोदींचा चेहरा महत्वपूर्ण आहे. दुसर्या लाटेत त्यांची लोकप्रियता थोडी कमी झाली असली तरी ते सध्या देशातील मोठे नेते आहेत.
संजय राऊत यांचे हे विधान प्रशांत किशोर यांच्या गांधी कुटुंबांसोबतच्या भेटीनंतर आले आहे. सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष कॉंग्रेस स्वबळावर लढण्याच्या गोष्टी करत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी कॉंग्रेसचा चिमटा काढला आहे.