दोन जिगरी दोस्तांच्या अतूट दोस्तीचं १४ डिसेंबरशी असलेलं अनोखं नातं, एकाचा आज जन्मदिन तर दुसऱ्याची पुण्यतिथी…

ही मैत्री कथा बॉलिवूड शोमन राज कपूर आणि जबरदस्त लोकप्रिय सदाबहार गीतकार शैलेंद्र यांची आहे. ज्यांची मैत्री अतुलनीय होती. एक नकार… त्या नकाराने शैलेंद्रसाठी राज कपूरबरोबर मैत्रीचा मार्ग मोकळा झाला होता. या जिगरी दोस्तीचे काही रंजक किस्से, आमच्या वाचकांसाठी खास.

या मैत्रीचा प्रवास सुरू झाला ते १९४० चे दशक होते. त्याकाळी शैलेंद्र कविता करत असताना एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली. राज कपूर यांना शैलेंद्रची ‘जलता है पंजाब’ ही फळणीवर आधारित असणारी ज्वलंत कविता फारच आवडली. त्यांनी स्वतःहून शैलेंद्र यांची भेट घेतली. त्यांना सदर कविता ही गीत रूपाने ‘आग’ (१९४८) या चित्रपटात वापरायला हवी होती म्हणून ती विकत घेण्याची विचारणा केली, सोबतच त्यांनी शैलेंद्रला ‘आग’ चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची ऑफरही दिली.

मात्र शैलेंद्रने त्यांची कविता विकायला नकार दिला आणि चित्रपटाची ऑफरही नाकारली. यानंतर, राज कपूर जेंव्हा ‘बरसात’ (१९४९) फिल्म बनवत होते तेंव्हा परिस्थिती इतकी बदलली की, आलेल्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शैलेंद्र यांना काम मागण्यासाठी राज कपूर यांच्याकडे जावे लागले. शैलेंद्र गेले आणि त्यांनी राज कपूर बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

राज कपूर अत्यंत आनंदाने सहमत झाले आणि शैलेंद्र यांची सन्मानाने गीतकार म्हणून नियुक्ती केली. आणि येथूनच मैत्रीचा प्रवास सुरू झाला. ‘बरसात में’ आणि ‘पतली कमर है’ ही तुफान गाजलेली दोन गाणी शैलेंद्रने या ‘बरसात’ फिल्म साठी लिहिली. ज्यासाठी त्यांना त्यावेळी ५०० रुपये मानधन देण्यात आले. यानंतर राज कपूर-शैलेंद्र यांनी तब्बल २१ जबरदस्त चित्रपटांसाठी एकत्र काम केले ज्यात ‘मेरा नाम जोकर’, ‘तीसरी कसम’, ‘सपनों का सौदागर’, ‘संगम’, ‘अनाडी’ आणि ‘जिस देश में गंगा बहती हैं’ इ. चा समावेश होता.

शैलेंद्रचे गाणे ऐकून राज कपूर भावनिक होऊन रडले होते. हा किस्सा आहे, अनाडी (१९५९) चित्रपटाचे ‘सब कुछ सिखा हमने, न सिखी होशियारी, सच है दुनियावालो के हम है अनाडी’ हे गाणे रेकॉर्ड केले जात होते. हे गाणे राज कपूर यांचे आवडते शैलेंद्र यांनीच लिहिलेले. झाले असे की, ज्या दिवशी हे गाणे रेकॉर्ड झाले त्यादिवशी रेकॉर्डिंगच्या वेळी राज कपूर स्टुडिओमध्ये पोहोचू शकले नव्हते, म्हणून ते रेकॉर्ड झालेले गाणे निवांत ऐकण्यासाठी राज कपूर घरी घेऊन गेले.

बरेच तास राज हे गाणे सतत ऐकत राहिले. ते खूपच भावनावश झाले. पण जेव्हा भावना अनावर झाल्या तेंव्हा राज कपूर चक्क रात्री २ वाजता शैलेंद्रला भेटायला त्यांच्या घरी पोहोचले. तिथे राज कपूरने शैलेंद्रला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले आणि म्हणाले, “काय जबरदस्त लिहिलंस शैलेंद्र, यार, माझे अश्रूच थांबत नाहीत. शाबास, ग्रेट”

१४ डिसेंबरशी या दोघांचे असलेला महत्त्वपूर्ण संबंध म्हणजे : १४ डिसेंबर १९६६ रोजी जेव्हा एकीकडे राज कपूर यांचा वाढदिवस साजरा केला जात होता तेव्हाच अचानक, तब्येत बिघडल्यामुळे शैलेंद्रला रुग्णालयात दाखल केले. पार्श्वगायक मुकेशने राज कपूर यांना फोन करून माहिती दिली की शैलेंद्रची प्रकृती अधिकच खराब होत आहे.

शैलेंद्र सध्या कोमात आहे, कृत्रिम श्वासोच्छ्वासाद्वारे ऑक्सिजन देण्यात आला आहे, रक्तही दिलेय. आणि त्यानंतर अचानक ती बातमी आली जिने राज कपूरसह संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली. दि. १४ डिसेंबरला राज कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशीच , अवघ्या ४३ वर्षीय शैलेंद्रने कायमचा या जगाचा निरोप घेतला. शैलेंद्रच्या मृत्यूने राज कपूर मात्र आतून मनाने खचला होता.

आज १४ डिसेंबर, स्टार मराठी टीम आणि समस्त चाहत्यांतर्फे या दोन्ही दिग्गजांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment