सिंधुदुर्गातील “ती” च्या जिद्दीची दखल घेतली थेट पंतप्रधान मोदींनी, स्वप्नांतही वाटले नव्हते, ते घडले प्रत्यक्षात…

.

सिंधुदुर्गातील ‘त्या’ मुलीचा फोटो व्हायरल झाला अन् थेट पंतप्रधान मोदींनी मदतीचा हात दिला. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका जिद्दी मुलीची पोस्ट व्हायरल झाली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार ही तरुणी ऑनलाईन अभ्यासासाठी गावातील डोंगरावर झोपडीत ऑनलाईन अभ्यासाचे धडे गिरवत होती. १२ वीत ८८% गुण मिळवून गावातून पशुवैद्यकीय पदवीचं शिक्षण घेण्यासाठी स्वप्नाली मुंबईत गेली. मात्र, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ती गावी आली.

गावात आल्यानंतर काही दिवसांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाला. दारिस्ते हे गाव म्हणजे दुर्गम भाग. गावात इंटरनेटला रेंज मिळत नसल्याने स्वप्नालीने आजूबाजूला, डोंगरात इंटरनेट रेंज चा शोध घेतला. उंच डोंगरावर एका तिला इंटरनेटची रेंज मिळाली.

मग दारिस्ते सारख्या दुर्गम भागात जिद्द, चिकाटी व मेहनत करत तिचा पशुवैद्यकीय पदवीचा तिसऱ्या वर्षांचा ऑनलाइन अभ्यास सुरू झाला. अनेक अडथळे आले, तरीहि ते अडथळे पार करून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ती जिद्दीने जंगलातील डोंगरावरील झोपडीत भर पावसात देखील दिवसभर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यत अभ्यास करत राहिली.

नंतर ही बातमी बऱ्याच न्युज चॅनल वर दाखवली गेली. इंटरनेट कनेक्शन आणि पुरेश्या सुविधा नसल्याने महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील या मुलीला ऑनलाइन लेक्चर्सच्या माध्यमातून शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुलीची मदत केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने या मुलीला मदत करण्यासंदर्भातील सूचना संबंधित यंत्रणांना केल्या आणि या मुलीला अगदी इंटरनेट कनेक्शनपासून लॅपटॉपर्यंत सर्व सुविधात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.एका आठवड्यामध्येच भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि भारत नेट खात्यामधील अधिकारी स्वप्नालीच्या गावी पोहचले. त्यांनी थेट ग्रामपंचायतीपासून स्वप्नालीच्या घरापर्यंत इंटरनेटचे कनेक्शन दिले.

यासंदर्भातील फोटो भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असणाऱ्या विजया राहटकर यांनीही ट्विटवरुन शेअर केला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी पुढील हजार दिवसांमध्ये देशातील प्रत्येक गावामध्ये ऑप्टीकल फायबर पोहचवण्याचे काम केलं जाईल असं म्हटलं होतं. मात्र खरोखरच आपल्या गावामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध होईल आणि आपला फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधानांकडून आपल्याला मदत मिळेल असा विचारही स्वप्नालीने केला नसेल.

परमेश्वर सुद्धा जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर सातत्याने प्रयत्न करून ध्येय गाठणाऱ्यालाच मदत करतो, हेच खरे.

Leave a Comment