भारताच्या एक अश्या क्रांतिकारी महिला ज्यांनी स्वातंत्र्याच्या अनेक वर्षे आधी परदेशात भारताचा झेंडा फडकवला होता…
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा आहे. अभिमानाचा आहे. मुक्ततेचा आहे. कारण ७५ वर्षांपूर्वी सारे भारतीय याच दिवसासाठी इंग्रजांशी लढले होते. म्हणून स्मृतीतला गौरवशाली दिवस म्हणून आपण १५ ऑगस्ट साजरा करतो. त्याच सोबत ज्या क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना स्मरण करून भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहतो.
वाचकांनो, या वर्षी आपण ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. ७५ वर्षं उलटले आहेत स्वातंत्र्याला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात. त्याचसोबत भारताच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा केला जातो. पण अश्यातच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला एका भारतीय क्रांतिकारी स्त्रीबद्दल सांगणार आहोत. जिने स्वातंत्र्याच्या ४० वर्षांपूर्वी परदेशात भारताचा झेंडा फडकवून ब्रिटिशांना आव्हान दिले होते. आश्चर्य चकित झालात ना ? हे खरं आहे. अशी भारतीय स्त्री होऊन गेलीय जिने एकटीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.
त्या स्त्री ने परदेशात हा ध्वज २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीच्या स्टटगार्ट येथील सातव्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये फडकवला होता. एवढं खरे आहे की त्यावेळी मात्र तिरंगा ध्वज आजच्यासारखा नव्हता. तर मग कसा होता ? ती स्त्री कोण ? हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या स्त्रीबद्दल बोललं जात आहे त्या मातेचं नाव आहे भिकाजी कामा. त्या एक भारतीय वंशाच्या पारशी नागरिक होत्या. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी लंडन ते जर्मनी पुढं अमेरिका असा प्रवास केला.
भिकाजी कामांनी पॅरिसमधून प्रकाशित केलेले ‘वंदे मातरम्’ पत्र भारतीय परदेशी प्रवासी लोकांमध्ये खूप लोकप्रिय झालेलं आहे. त्यांनी जर्मनीत फडकावलेला त्याकाळच्या ध्वजामार्फत आपल्या देशातील विविध धर्मांच्या भावना आणि संस्कृतीला समरस करण्याचा प्रयत्न केला होता.
भिकाजी कामा या इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेसमध्ये आपल्या भाषणात म्हणाल्या होत्या की, ‘भारतात ब्रिटीश राजवट जास्त काळ चालू ठेवणे खूप घातक ठरू शकतं. त्यामुळे भारता सारख्या एका महान देशाच्या हिताचे काहीच घडत नाहीये. उलट मोठे नुकसान होत आहे. त्यांनी बैठकीत उपस्थित लोकांना भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते आणि भारतातील लोकांना आवाहन करताना म्हणाल्या, पुढे जा, लढा. संघर्ष करा.
आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि हिंदुस्थानीच राहणार आहोत. त्यांचे हे भाषण प्रत्येक भारतीयांना खूप उर्जा आणि ताकत देऊन गेले असावे यात कसलीच शंका नाही. भिकाजी कामा हे महिला व्यक्तिमत्व खूप अतुलनीय होतं. अभिमानी होतं. अशी क्रांतिकारी स्त्री पुन्हा होणे नाहीच.
भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबई येथे झाला होता. लोकांना मदत आणि सेवा करण्याची भावना त्यांच्या आत कुटून कुटून भरली होती. १८९६ मध्ये मुंबईत प्लेगचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भिकाजी कामा यांनी त्या रुग्णांची सेवा केली. जरी नंतर त्या स्वतः देखील या रोगामुळे ग्रासल्या असल्या तरी, त्यांनी कार्य सुरूच ठेवले. परंतु उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या होत्या. १३ ऑगस्ट १९३६ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांपूर्वी आधीच त्यांचे निधन झाले.
बघा म्हणजे जेव्हा आपल्या इथे स्वातंत्र्याचे नुकतेच बीज पेरले जात होते तेव्हा भिकाजी कामा या महिलेने भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा जर्मनीत फडकवून एक क्रांतिक्रारी प्रेरणा देणारे पाऊल टाकले होते. त्या माऊलीस विनम्र अभिवादन !…