विशेष यशप्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात करा श्री विष्णूप्रिय सफला एकादशी व्रत, जाणून घ्या महत्व, मुहूर्त, मंत्र…

मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी ही सफला एकादशी नावाने मान्यता प्राप्त आहे. सफला एकादशीचे महत्त्व, व्रतपूजनाचा मुहूर्त, विधी आणि काही मान्यतांबाबत जाणून घेऊया…

सफला एकादशी मान्यता : समस्त भाविक भक्तांसाठी ही विशेष माहिती. नुकतीच सन २०२१ ला सुरुवात झाली असून, या वर्षातील व्रत-वैकल्ये, सण-उत्सवही सुरू झाले आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला श्रीगणेश भक्तांद्वारे संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरण्यात आले. आता यानंतर या वर्षातील पहिली एकादशी शनिवार, ०९ जानेवारी २०२१ रोजी येत आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी सफला एकादशी नावाने ओळखली जाते.

सफला एकादशीचे व्रत आचरल्यास हाती घेतलेल्या कामात उत्तम यश मिळते, अशी मान्यता हिंदू धर्मशास्त्रात आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वेगळी अन वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. मार्गशीर्ष महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या सफला एकादशीचे महत्त्व, व्रतपूजनाचा मुहूर्त, विधी आणि काही मान्यतांबाबत जाणून घेऊया…

सफला एकादशी महत्व : सफला एकादशीचे व्रताचरण करताना श्रीविष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांचे पूजन केल्याने विशेष यशप्राप्ती होते, असे मानले जाते. ‘मासांना मार्गशीर्षोऽहम्’ या वचनाने भगवद्गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव करण्यात आलेला आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. यामुळेच मार्गशीर्षातील वद्य पक्षात येणारी एकादशी महत्त्वाची मानली गेली आहे.

सफला एकादशी मुहूर्त : सफला एकादशी : शनिवार, ०९ जानेवारी २०२१
मार्गशीर्ष वद्य एकादशी प्रारंभ : शुक्रवार, ०८ जानेवारी २०२१ रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटे.
मार्गशीर्ष वद्य एकादशी समाप्ती : शनिवार, ०९ जानेवारी २०२१ रोजी रात्री ७ वाजून १५ मिनिटे.

सफला एकादशी व्रतपूजन :

  • सकाळी स्नानादी नित्यकर्मे उरकून बाळकृष्णाची चौरंगावर स्थापना करावी.
  • यानंतर भक्तिभावे बाळकृष्णाचे आवाहन करावे.
  • यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा.
  • एक भरपूर पाणी असलेला नारळ फोडावा. नारळाचे सर्व पाणी एका चांदीच्या किंवा स्टीलच्या भांड्यात घ्यावे. (तांबे किंवा पितळेच्या भांड्यात नको कारण ते खराब होऊ शकते).
  • बाळकृष्णाच्या मूर्तीवर १६ वेळा पुरुषसूक्त म्हणत या नारळपाण्याचा अभिषेक करावा. पुरुषसुक्त येत नसेल तर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र सगळे पाणी संपेपर्यंत म्हणून पळीने अभिषेक करावा.
  • अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, उपलब्ध फुले,फळे बाळकृष्णाला अर्पण करावीत.
  • धूप, दीप अर्पण केल्यानंतर खोबऱ्यात साखर मिसळून त्याचा बाळकृष्णाला नैवेद्य करावा.
  • यानंतर आरती करावी. मनोभावे नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.
  • शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे.
  • या सफला एकादशीला अशी उपासना करणाऱ्याला श्रीकृष्ण महाराज चांगले फल देऊन आशिर्वाद देतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Leave a Comment